पुणे, दि. 12: कृषी विभागामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या ‘शेतकरी’ मासिकात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी विकासाच्या नव्या वाटा, प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा आदी बाबी प्रसिद्ध केल्या जातात. या बाबी प्रचार, प्रसिद्धीद्वारे अधिकाधिक थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकरी मासिक वाचन सप्ताह 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत राज्यात साजरा करण्यात येत आहे.
सप्ताह कालावधीत गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच, मासिकाचे वर्गणीदार करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी यांना सभासद करण्यात येत आहेत. मासिकाची वार्षिक वर्गणी 250 रुपये आणि द्विवार्षिक वर्गणी 500 रुपये आहे.
या सप्ताहामध्ये शेतकरी मासिकामध्ये प्रसिद्ध झालेले लेख त्या त्या विभागाच्या प्राधान्य क्रमानुसार गावामध्ये सामूहिकरीत्या वाचन करून लेखातील माहिती समजून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील पीकस्पर्धा विजेते, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच नाविन्यपूर्ण, प्रयोगशील व उल्लेखनीय काम करणाऱ्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग तसेच मार्गदर्शन घेण्यात येत आहे. शेतकरी मासिकामध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखासोबत क्यूआर कोडच्या माध्यमातून अधिकची माहिती देण्यात येते. हे क्यूआर कोड स्कॅन करणे आणि त्यातील माहिती कशी पहावी याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहायक तसेच नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी मासिक वाचन सप्ताहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.