बारामती. महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय शारदानगर येथे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांची पणन विषयक कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थाचे संचालक डॉ. सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन, सहायक व्यवस्थापक अनंत सावरकर, उपनिबंधक संदीप जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मिलिंद टंकसाले, वरिष्ठ विपणन अधिकारी ऋग्वेद सुरवसे, विशेष लेखा परीक्षक विजय पाखले आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. घुले म्हणाले, राज्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांच्याकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या पणन मंत्री यांच्या संकल्पनेनुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. पणन मंडळाच्यावतीने पणन संबंधित महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रकांची पुस्तिका तयार करण्यात आली असून ती बाजार समितीचे कामकाज करताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे डॉ. घुले म्हणाले.
श्री. पवार यांनी बाजार समित्यांनी शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे यावेळी सांगितले.
उपनिबंधक श्री. जाधव यांनी कृषी पणन कायदा व त्यामधील महत्त्वाच्या सुधारणाबाबत तसेच बाजार समितीचे अधिकार व कर्तव्य याबाबत श्री. टंकसाले यांनी मार्गदर्शन केले.
श्री. सावरकर यांनी शेतमालाची निर्यात व कृषी पणन मंडळाचे योगदान आणि व्यवस्थापक कैलास फटांगरे यांनी बाजार समित्यांसाठी असणाऱ्या पणन मंडळाच्या विविध संगणक प्रणालीबाबत तसेच श्री. सुरवसे यांनी केंद्र शासनाच्या कृषी पणन विषयक असणाऱ्या विविध योजनासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी बाजार समितीच्या क्रमवारीत बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सभापती सुनील पवार यांच्यासह सर्व सहकारी संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.