ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- तहसीलदार गणेश शिंदे

बारामती दि.१६- राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सर्व यंत्रणांनी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करत कामे करावीत, असे निर्देश तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिले.

ग्रापंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसिलदार तुषार गुंजवटे, शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे आदी उपस्थित होते.

तहसीलदार श्री. शिंदे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून तालुक्यात एकूण ३२ ग्रामपचायतींचे मतदान ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावीत.

पोलीस विभागाने मतदान केंद्राच्या यादीनुसार तसेच अति संवेदनशील मतदान केंद्र लक्षात घेऊन बंदोबस्ताचे, प्रचार परवानगीबाबत नियोजन करावे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसेस व्यवस्था, उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहन परवानगी तसेच नगर पालिका, पंचायत समिती, आरोग्य विभाग, वनपरिक्षेत्र, जलसंधारण इत्यादी विभागांना नेमून दिलेल्या कामाचेही नियोजन करून निवडणुका शांततेत पार पडतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *