प्रतिनिधी -सळसळता उत्साह आणि जोश, अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी यामुळे यंदाची मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा चांगलीच रंगतदार ठरली. महाराष्ट्राला आजवर दर्जेदार वक्ते देणा-या कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद पंकज पंढरीनाथ पांडुळे बी. के. बिर्ला महाविद्यालय, मुंबई याने पटकावले. तर याच महाविद्यालयाचा संघ वादविवाद स्पर्धेचा प्रथम मानकरी ठरला. वक्तृत्वाचा कस लागणा-या उस्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद यश रविंद्र पाटील याने पटकावले. तर कनिष्ठ महाविद्यालय विभागामध्ये श्रध्दा सुरेश अहिनवेने प्रथम क्रमांक मिळवला.
प्रसिद्ध लोककलावंत आणि मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे, विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. वक्तृत्वामधील मोरोपंत विषयामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जयराम प्रकाश पिंगळे याने वरिष्ठ विभागामध्ये तर समृद्धी धनंजय निळ हिने कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
बारामती नगर परिषद आणि तुळजाराम चतुरचंद महाविदयालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०५ आणि ०६ ऑक्टोबर रोजी कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे हे ५०वे वर्ष असून वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालमधून ८७ स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते . स्पर्धेचे परीक्षण डॉ. विलास बुवा, प्रा.मानाजी गावडे , श्री.विवेक पांडकर, प्रा.राजकुमार कदम, प्रा. गोरखनाथ लडकत, प्रा.जया कदम यांनी केले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहामध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाहिरी, काकनी, गोंधळ इत्यादी लोककलेचे सादरीकरण करत मनोगतामधून उपस्थितांचे प्रबोधन केले. कलावंत हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचे जतन करतात. असे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण करताना श्री. विकास शहा लेंगरेकर यांनी विजेत्यांचे कौतूक केले, तर बक्षीस न मिळालेल्या स्पर्धकांना खचून न जाता स्पर्धकांनी जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच ही स्पर्धा वक्तृत्वाची पंढरी आहे आणि सर्व स्पर्धक या पंढरीचे वारकरी आहेत, या वारकऱ्यांनी दरवर्षी पंढरीमध्ये यावे असे गौरवाद्गार या प्रसंगी त्यांनी काढले. स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रा. कृष्णा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले दरम्यान सर्व बक्षिसे दात्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला स्पर्धेचे बक्षिसेदाते, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार , सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . स्न्हेल कदम आणि प्रा. ऋतुजा आगम यांनी केले. तर प्रा. डॉ. सीमा नाईक गोसावी यांनी आभार व्यक्त केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-
कनिष्ठ महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक -श्रध्दा सुरेश अहिनवे ( शारदाबाई पवार महाविद्यालय , बारामती )
मोरोपंत या विषयात प्रथम क्रमांक – समृद्धी धनंजय निळ ( तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविदयालय , बारामती )
द्वितीय क्रमांक – गायत्री गणेश अंभुरे ( फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालय , पुणे )
वरिष्ठ महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक – पंकज पंढरीनाथ पांडुळे ( बी . के . बिर्ला महाविद्यालय , मुंबई )
मोरोपंत या विषयात प्रथम क्रमांक – जयराम प्रकाश पिंगळे ( तुळजाराम चतुरचंद महाविदयालय , बारामती )
द्वितीय क्रमांक – महेश जनार्दन उशीर (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर )
विशेष प्राविण्य – गौरी भारत पवार ( शिवनगर विद्या प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय , माळेगाव )
उत्तेजनार्थ – केतन दिनेश गुप्ता ( शेठ. जे. एन .पालीवाला कॉलेज , पाली, रायगड )
उत्तेजनार्थ – यश रवींद्र पाटील ( बी . के . बिर्ला महाविद्यालय , मुंबई )
वाद -विवाद स्पर्धा
प्रथम क्रमांक – संघ -बी. के. बिली महाविद्यालय, मुंबई
(स्पर्धक – पंकज पंढरीनाथ पांडुळे आणि यश रवींद्र पाटील)
द्वितीय क्रमांक -संघ – न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय अहमदनगर
(स्पर्धक–महेश जनार्धन उशीर आणि आकाश दत्तात्रय मोहिते)
उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक – यश रवींद्र पाटील ( बी . के . बिर्ला महाविद्यालय , मुंबई )
द्वितीय क्रमांक–मुग्धा अमित थोरात ( फर्ग्युसन महाविद्यालय , पुणे )