प्रतिनिधी – बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेचे उदघाटन दि. ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जवाहर शाह वाघोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अत्यंत थाटामाटात व उत्साहात पार पडले. या उदघाटन सोहळ्या साठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे, तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे जेष्ठ सदस्य श्री. चंद्रगुप्त शाह वाघोलीकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या पुढाकाराने १९७२-७३ मध्ये ही स्पर्धा सुरू केली होती. यंदा स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे यांनी वाचन संस्कृती लोप पावत चाललेल्या डिजिटल युगामध्ये वक्तृत्वाचा ठेवा अखंडितपणे ५० वर्षे जपल्याबद्दल महाविद्यालयाचे व संस्थेच्या पदाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व ही स्पर्धा पुढील अनेक वर्षे अश्याच पद्धतीने चालू राहावी या साठी नगर परिषदेकडून भरीव योगदानाची ग्वाही दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना मा. श्री. जवाहर शाह वाघोलीकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा अत्यंत मोलाची असून गेली ५० वर्षे वक्तृत्वाची ही वारी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेद्वारे चालू आहे याबद्दल समाधान व्यक्त केले व या मध्ये सर्व आजी माजी प्राचार्य व स्पर्धेचे कार्याध्यक्ष यांचे योगदान महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून अनेक विद्यार्थी या स्पर्धेकरिता सहभागी झाले असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय गटामध्ये वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत तर दुस-या दिवशी वादविवाद स्पर्धा आणि उत्स्फूर्त स्पर्धा होत आहे. या प्रसंगी जमलेल्या सर्व मान्यवर व उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी केले. स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रा. कृष्णा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर व सूत्र संचालन प्रा. प्रणित वाबळे व प्रा. स्नेहल कदम यांनी केले.