फूल शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा- कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील
पुणे, दि. 3: फूलांवर मूल्यवर्धन प्रक्रियेद्वारे त्यातील नैसर्गिक रंग, सुवासिक द्रव्य मिळवावीत तसेच सुकविण्याच्या अत्याधुनिक पद्धतीद्वारे सुकवून फुलांचे विक्रीमूल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.
फुल उत्पादक, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि खाजगी गुंतवणुकदार यांचेसाठी मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय सुगी पाश्चात्त्य तंत्रज्ञान संस्था (एनआयपीएचटी) तळेगाव दाभाडे येथे फूलपिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व एनआयपीएचटी येथे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते.
या प्रसंगी मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, कृषी महाविद्यालय पुणे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर, एनआयपीएचटीचे संचालक डॉ. सुभाष घुले आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, सजावटीमध्ये प्लास्टिकपासून तयार केलेल्या फुलांचा वापर करणे टाळावे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नैसर्गिक फुलांची सुकवणूक करत टिकण्याची क्षमता वाढवता येते. ते तंत्र शिकून घ्यावे व उत्पन्नात वाढ करावी.
श्री. कोकरे यांनी प्रशिक्षणामध्ये फूल प्रक्षेत्र भेटीचे महत्व तसेच फुलांचे विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.अमोल यादव यांनी मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविकात आखिल भारतीय समन्वित पुष्प संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन डॉ. रविंद्र बनसोड यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती यांनी दिली.
या प्रशिक्षणास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 50 च्यावर फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना फूल पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्तम शेती पद्धती, खत, पाणी, कीड व रोग व्यवस्थापन, फूल पिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींसाठी अखिल भारतीय समन्वित पुष्प संशोधन प्रकल्प, गणेश खिंड पुणे येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. विष्णु गरांडे व डॉ.सुभाष भालेकर सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या यांनी काम केले. कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्प पुणे व एनआयपीएचटी चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.