प्रतिनिधी – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामतीतील भारतातील पहिल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील (इंडो-डच) भाजीपाला रोपवाटिकाचा राष्ट्रीय बागवानी बोर्ड, गुरगाव (हरियाणा) यांच्या कडून थ्री स्टार मानांकन (सर्वोत्तम) दर्जा हा देण्यात आला. अशा प्रकारचे मानांकन मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली आणि भारतातील तिसरी भाजीपाला रोपवाटिका ठरली आहे. हे मानांकन परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय बागवानी बोर्ड, गुरूग्राम (हरियाना) व पुणे उपविभागाचे डॉ. ए.के.सिंग व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या बोर्डाकडून देशातील ७७१ रोपवाटिकांचे मानांकन करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील एकूण ३१ भाजीपाला रोपवाटिकेमधून भाजीपाला गुणवत्ता केंद्रास महाराष्ट्रामधील पहिली रोपवाटिका व भारतामधील तिसरी “थ्री स्टार” मानांकनाने सन्मानित करण्यात आली.
भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये डच टाईप अत्याधुनिक रोपवाटिकामध्ये कुशल कर्मचारी मार्फत ही रोपवाटिका चालवली जाते. यामध्ये आधुनिक बेंच सिस्टीम, बी उगवण कक्ष, फॅन व पॅड टाईप चे पॉलीहाउस तसेच हार्डनिंग कक्ष यांचा समावेश आहे. रोपवाटिकेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार चांगल्या दर्जाची रोपे बनवून दिली जातात. त्यामध्ये रोपे तयार करताना जर्मनीतून आयात केलेले मिडिया परलाईट व पिटमॉस वापरून रोपे तयार केली जातात. रोपवाटिकेमधील कोकोपीट हे आर.एच.पी. प्रमाणित निर्जंतुकीकरण केलेले असते. रोपे तयार करत असताना आधुनिक बीज रोपण यंत्रणा वापरली जाते. तसेच खत व पाणी व्यवस्थापन हे रोबोटिक बूमच्या सहाय्याने केले जाते.
तसेच या रोपवाटिकामध्ये भाजीपाला रोपांमध्ये आधुनिक कलम तंत्रज्ञान वापरून रोपे तयार केली जातात. त्यामुळे रोपांमध्ये येणाऱ्या जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपांचे आयुष्य वाढून त्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. या केंद्रामार्फत मोफत रोपे विक्री पश्चात मार्गदर्शन केले जाते. तसेच भाजीपाला लागवड संदर्भाने विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. गुणवत्तापुर्ण भाजीपाला रोपे निर्मितीसाठी केंद्रामार्फत उद्यानविध्या विषयतज्ञ श्री. यशवंत जगदाळे व तुषार जाधव, विजय मदने नेहमीच प्रयत्नशील असतात.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख श्री. राजेंद्र पवार, विश्वस्त श्री. विष्णुपंत हिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे व कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी मिळालेल्या मानांकनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.