बारामती : ‘सध्याच्या काळात माणसाच्या इच्छा अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. त्या वाढलेल्या अपेक्षांचे ओझे घेऊन माणूस जगत असतो. त्यामुळे त्याचा प्रचंड ताण मनावर येतो. त्या तणावाचा परिणाम शरीरावर पर्यायाने अध्यापनावर होतो.’असे उद्गार मनशक्ती प्रयोग केंद्राचे व्याख्याते श्री.मनीष शिंदे यांनी काढले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘तणावमुक्त अध्यापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर हे होते.
श्री.मनीष शिंदे पुढे म्हणाले, ‘माणसाची प्रगती घडवून आणणारा ताण सकारात्मक असतो. परंतु त्याची अधोगती सुरु झाली कि त्या ताणाचे नकारात्मकतेत रुपांतर होते. त्यामुळे कोणत्या घटना माझ्या नियंत्रणामध्ये आहेत व कोणत्या नाही याचा विचार करून वर्तन करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात सगळ्यात जास्त मानसिक ताणाचे कारण मोबाईल आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर आपण बंदी आणू शकत नाही. परंतु त्याबद्दल जागृत करू शकतो व हे काम शिक्षकच करू शकतो.’ असे सांगून अनेक उदाहरणांच्या माध्यमातून तणावमुक्त अध्यापन कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.
डॉ. सचिन गाडेकर यांनी आपल्या भाषणात सध्याची शिक्षण पद्धती, नवीन शैक्षणिक धोरण याचा प्राध्यापकांवर मनावर कसा ताण येतो व त्याचे व्यवस्थापन कसे करायचे या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीच्या संयोजक डॉ. मुक्ता आंभेरे यांनी केले. डॉ. देविदास भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. अनिकेत डमाळे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. भगवान माळी यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.