तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील १९ खेळाडूंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दीड लाखाची शिष्यवृत्ती

बारामती: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २००७-०८ पासून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना दर वर्षी क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील १९ खेळाडूंना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ व ३ री खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या सांघिक क्रीडा प्रकारामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विविध संघातील प्रत्येक खेळाडूला तसेच मा. राज्यपाल यांच्या प्रेरणेने आयोजित कृषी व अकृषी विद्यापीठ अंतर्गत २४ वीक्रीडा महोत्सव स्पर्धांमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विविध संघातील प्रत्येक खेळाडूला ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील १९ खेळाडूंना तब्बल एकूण दीड लाखाहून अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन मिळेल आणि शिक्षणासाठी फायदा होईल, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हणाले. इतक्या मोठया संख्येत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात यश मिळणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे असेही ते म्हणाले. खेळाडूंच्या यशामध्ये क्रीडाशिक्षक म्हणून जिमखाना विभागाचे विभागप्रमुख डॉ. गौतम जाधव आणि प्रा.अशोक देवकर यांचे विशेष योगदान आहे. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर, सचिव मिलिंद शहा वाघोलीकर, संस्थेचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *