बारामती, दि. १७: कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन करण्याकरीता २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (आत्मनिर्भर भारत पॅकेज) योजनेअंतर्गत प्रकल्पांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तरवृद्धीकरीता पात्र प्रकल्पांना बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प आराखड्याच्या किंमतीच्या किमान ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. बँक कर्जाच्या व्याजदरात ३ टक्के पर्यंत सुट देण्यात आलेली आहे.
या प्रक्रिया उद्योगांचे वैयक्तिक कृषी प्रक्रिया उद्योजक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत असलेले महिला बचत गट, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती, प्रगतशील शेतकरी, कृषी पदवीधर, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे अधिकारी, नागरी सेवा केंद्र चालकांचे ऑनलाईन अर्ज, प्रस्ताव तयार करणे, बँक कर्ज मंजुरी तसेच आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व अग्रणी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून बँक स्तरावर असलेल्या त्रुटींचा पूर्तता संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.