बारामती: येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती व महाराष्ट्र शासन संचलित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीचे भूल शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सूरज जाधव यांनी ‘निरोगी जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी ते म्हणाले की,” जीवन जगताना निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे. आजाराचे ओझे मनुष्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक , आर्थिक व भावनिक दृष्ट्या परिणाम करते. अल्कोहोल, तंबाखू स्मोकिंग या व्यसनांचे शरीरावर दूरगामी परिणाम होतात. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी बुद्धीचा वापर करावा. निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते म्हणून निरोगी जीवनशैलीसाठी मन प्रसन्न असावे.” शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रज्ञा भालेराव यांनी अवयवदान अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजसेवा अधिक्षक डॉ.तुषार सावरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अवयवदानाबद्दलची शपथ दिली. यावेळी डॉ.तुषार साखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कला शाखा अधिष्ठाता डॉ.सीमा नाईक-गोसावी यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भगवान माळी यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संदीप चोरडिया यांनी आभार मानले. १५० विद्यार्थी -विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांनी शुभेच्छा दिल्या.