दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

पुणे, दि. २८: पुरंदर उपविभागातील दौंड व पुरंदर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच अन्य प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी पोलीस पाटील भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, सोनारी व हिवरे या गावांतील पुणे वर्तुळाकार महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने १ ऑगस्ट रोजीची नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखेपर्यंत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. दौंड-पुरंदर उपविभागीय कार्यालयाकडून लेखी परीक्षेचा दिनांक, स्थळ व पुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *