बारामती, दि. 20: मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि नाथसन शेतकरी उत्पादक कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथे टोमॅटो पीक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी व्यवस्थापक महेश जाधव, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, कंपनीचे अध्यक्ष नितीन तावरे, सचिव योगेश तावरे आदी उपस्थित होते.
श्री. हिरेमठ म्हणाले, टोमॅटो तसेच भाजीपाला पिकांची मूल्य साखळी तयार करणे आवश्यक आहे. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करता येईल. तसेच विक्रीचे व्यवस्थापन करून अधिकचा नफा शेतकरी सभासदांना मिळवून देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीने नियोजन करावे.
श्री. जाधव म्हणाले, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी ग्राफ्टिंग तंत्रज्ञान वापरून टोमॅटो, मिरची, वांगी आदी पिकांच्या रोपांची पुनर्लागवड केले आहे. त्यामधून अधिकाधिक उत्पन्न घेण्याबाबत तसेच या रोपांची लागवड केल्याने कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात उद्भवल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यात होणाऱ्या वाढीबाबत मार्गदर्शनही श्री. जाधव यांनी केले.
यावेळी उपस्थितीत सभासदांना प्रकल्पामधील निविष्ठांचे वाटपही करण्यात आले.