बारामती, दि. २१: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे लठ्ठपणा या छुप्या आजाराची ओळख होण्यासाठी जनजागृती सोबतच लठ्ठपणा उपचार अभियान राबविण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रभारी अधिष्ठाता डॉ. विवेक सहस्रबुद्धे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे, अभियानाचे समन्वयक तुषार सावरकर, नोडल अधिकारी डॉ. राहुल मस्तूद, सहायक प्राध्यापक डॉ. भारत कडलासकर, डॉ. हर्षल त्रिवेदी, डॉ. चंद्रशेखर त्रिवेदी, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, समाजसेवा अधीक्षक संध्या नाईक, विनायक साखरे, अधीपरीचारिका शैला पवार, स्नेहा हल्लाळे आदी उपस्थित होते.
या अभियानात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महिला ग्रामीण रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, व तालुका पोलिस स्टेशन बारामती येथील कर्मचाऱ्यांची तपासणी कारण्यात आली. यावेळी श्री. सावरकर यांनी लठ्ठपणा उपचार व जनजागृती अभियानाची माहिती दिली. त्यानंतर डॉ. सहस्रबुद्धे यांनी या अभियानाची आवश्यकता विषद केली.
डॉ. मस्तूद यांनी स्थूलपणा होण्याची वेगवेगळी कारणे विषद करून सादरीकरणाद्वारे भारताची स्थूलपणा या आजारावरील सद्यस्थिती, भारतीयांचा व्यायामाबाबत गैरसमज, अति व वारंवार खाण्याच्या सवयी तसेच लठ्ठपणा टाळण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे, उच्च कार्ब आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे व नियमित व्यायाम याबाबत माहिती दिली.