बारामती, दि. १५ : कृषि विभाग आणि पाणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील माऊली शेतकरी गट व भैरवनाथ शेतकरी गटांतील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर दशपर्णी अर्क निर्मिती, प्रकाश सापळा, माती परीक्षण नमूने व बीज उगवणक्षमता इत्यादी प्रात्यक्षिकांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले.
यावेळी तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी पर्यवेक्षक श्री. काझडे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, माऊली व भैरवनाथ गटातील शेतकरी आदी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. काचोळे यांनी शेतकऱ्यांना शेती, शेतीतील सुधारित पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करून बीज उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया बाबत चर्चा केली. कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेसाठी लागणारी औषधे व कामगंध सापळे अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचे काम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.
तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हांगमाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना मानक कार्यप्रणालीची माहिती देऊन काही प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. गटातील सर्व शेतकऱ्यांनी दशपर्णी अर्क बनवण्याची माहिती घेवून २०० लिटर दशपर्णी अर्क बनवला. यानंतर श्री. काचोळे यांनी मौजे पिंपळी येथील प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत कृष्णा एंटरप्रायजेसच्या लाकडी तेल घाणा युनिटची पाहणी केली.