प्रतिनिधी – अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामतीच्या प्राचार्यपदी डॉ.अविनाश जगताप यांची दि. १ मे २०२३ पासून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रोफेसर डॉ.अविनाश जगताप हे या महाविद्यालयात गेल्या ३५ वर्षांपासून प्राध्यापकपदी, तर २०१५ पासून संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते कामकाज पहात आहेत तर २०१७ पासून उपप्राचार्य पदावर काम करीत आहेत. आय.क्यू.ए.सी. को-ओर्डीनेटर म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. तसेच या महाविद्यालयाच्या नियामक मंडळावर तसेच विद्या परिषदेवर, अभ्यास मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. प्रो.डॉ.अविनाश जगताप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार’ व पर्ल फाऊंडेशन, मदुराई या संस्थेकडून ‘बेस्ट युथ वेलफेअर को-ओर्डीनेटर’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रो.डॉ. अविनाश जगताप यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ३८ शोधनिबंध, २ संदर्भग्रंथ ,१० क्रमिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ३ पेटंट व २ संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी १० वर्षे काम पाहिले आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात गेल्या ३६ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून तर १५ वर्षांपासून प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले डॉ.चंद्रशेखर मुरूमकर हे दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीने प्रोफेसर डॉ.अविनाश जगताप यांच्या आजपर्यंतच्या कामाचा विचार करून त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे सचिव श्री.मिलिंद शाह वाघोलीकर यांनी डॉ.अविनाश जगताप यांना प्राचार्य पदाचा पदभार दिला व त्यानिमित्त त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ.चंद्रशेखर मुरूमकर, रजिस्ट्रार श्री.अभिनंदन शहा, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.