कृषी आयुक्तांसह तज्ज्ञ मंडळींची उपस्थिती; डाळिंब संशोधन केंद्रातर्फे आयोजन
पंढरपूर : अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ, कृषी विभाग, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे, शेती उत्पादकमधील ॲग्रीकॉस कंपन्या व सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने आणि नाबार्ड, अपेडा, राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुण्याच्या सहकार्याने पंढरपुरात येत्या ११ एप्रिल २०२३ ला डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘जीआय’ मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्र वितरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंढरपुरातील कराड नाक्यानजीक श्रीयश पॅलेसमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे.
राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे असतील. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, अपेडाच्या उपसरव्यवस्थापक सौ. विनिता आहेत. सुधांशू, चेन्नईच्या ट्रेडमार्क आणि जीआय विभागाचे वरिष्ठ परीक्षक प्रशांतकुमार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, ‘नाबार्ड’चे व्यवस्थापक नितीन शेळके, डाळिंब केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड, फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे सल्लागार गोविंद हांडे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन, डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, माजी अध्यक्ष शहाजीराव जाचक, उपाध्यक्ष प्रताप काटे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. विविध शेती शेत्रातील डाळिंब साठी लागणारी उत्पादने माहिती पुरविण्यासाठी विविध शेती कंपनी स्टॉल असणार आहेत, त्याद्वारे डाळिंब साठी अधिक माहिती मिळणार आहे.
महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. त्यानंतर आता डाळिंब उत्पादकांना ट्रेडमार्क आणि जीआय विभाग चेन्नई येथून अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या प्रमाणपत्राचा वापर डाळिंब विक्री आणि निर्यातीसाठी करता येणार आहे. या अनुषंगाने हे प्रशिक्षण होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डाळिंब संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी ९४०३४६०१९४, ९८८१५१५१५३ या नंबर वर नाव नोंदणी करावी.