कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती उपविभागात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

पुणे दि. २२- केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती कृषी उपविभागात दौंड आणि इंदापूर तालुक्यात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करून त्याआधारे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. निरनिराळ्या एकात्मिक शेती पद्धतींचा अवलंब करून दुष्काळ, पूर व हवामानातील अनपेक्षित बदलामुळे होणारे नुकसान टाळणे, अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन वाढविणे व शाश्वत रोजगार उपलब्ध करणे, कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनातील जोखीम कमी करून शेतकऱ्यांचा कोरडवाहू शेतीबाबत आत्मविश्वास वाढविणे हे योजनेचे प्रमुख उद्देश आहेत.

या योजनेअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचे निधी वितरणाचे प्रमाण ६०:४० असे आहे. फळपीक आधारीत शेती पद्धतीस २५ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. दुग्धोत्पादक पशुधन आधारीत शेती पद्धतीस प्रति हेक्टर ४० हजार रुपये, इतर पशुधन आधारीत शेती पद्धतीस प्रति हेक्टर २५ हजार रुपये, ग्रीन हाउस ट्यु ब्युलर टाइप नैसर्गिक वायुवीजनास प्रति चौ.मी. ला ४६८ रूपये, शेडनेट हाउससाठी प्रति चौ.मी. ला ३५५ रूपये याप्रमाणे अनुदान देण्यात येते.

मूरघास युनिट साठी १ लाख २५ हजार रुपये प्रति युनिट, मधुमक्षिका पालनासाठी प्रति कॉलनीस २ हजार रुपये, काढणी पश्चात तंत्रज्ञानासन प्रति चौ.मी. साठी ४ हजार रुपये, गांडूळ खत युनिट (कायमस्वरूपी) ५० हजार रुपये प्रति युनिट आणि हिरवळीचे खत प्रति हेक्टर २ हजार रुपये अनुदान देय राहील.

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी दौंड तालुक्यातील पिंपळाचीवाडी-खोर येथे पशुपालनच्या १३ घटकासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये २ लाख ६० हजार, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ५० घटकांसाठी १० लाख, गांडूळखताच्या १ युनिटसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ५० हजार, मुरघासच्या ४ युनिटसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ५ लाख रुपयांचे असे सर्व मिळून १८ लाख १० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी – कळस येथे पशुपालनच्या २० घटकांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ४ लाख, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३२ घटकांसाठी ६ लाख ४० हजार, गांडूळखत युनिटच्या २ घटकांसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये १ लाख रुपये, मुरघास युनिटच्या २ घटकांसाठी २ लाख ५० हजार, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३ घटकांसाठी ३ लाख ७५ हजार रुपयांचे असे एकूण १७ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि कोरडवाहू क्षेत्रातील इच्छूक घटकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *