प्रतिनिधी – खरंतर पहाटेची वेळ म्हणजे साखर झोपेची वेळ पण अशा या वातावरणात भिगवणच्या विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात मात्र भिगवणकरांचे मळे फुलू लागले आणि निमित्त होते, फ्लेमिंगो मॅरेथॉन स्पर्धेचे…… महिला दिनाचे औचित्य साधून विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, बिल्ट, भिगवण या शाळेने अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यापैकीच एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे फ्लेमिंगो मॅरेथॉन स्पर्धा. रविवार, दिनांक ५ मार्च रोजी ही स्पर्धा आयोजित केली गेली. प्रत्येक क्रीडा प्रकारातून स्पर्धकांना एक संदेश मिळत असतो आणि असाच शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश या स्पर्धेमार्फत शाळेने नागरिकांना दिला. भिगवणची खरी ओळख उजनी जलाशयातील फ्लेमिंगो पक्षी ही आहे आणि त्यामुळेच या मॅरेथॉनचे नाव ‘फ्लेमिंगो मॅरेथॉन’ ठेवण्यात आले. मॅरेथॉनमुळे स्पर्धकाच्या सहनशक्तीचा व चिकाटीचा कस लागतो.
भिगवण आणि इंदापूरच्या परिसरात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा असून या स्पर्धेसाठी अत्यंत कमी कालावधीमध्ये एकूण १२०० जणांनी नोंदणी केल्याने हा मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विजेते पद मिळवण्यापेक्षा स्पर्धेतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडली. यापैकी पहिला टप्पा आठ किमी (महिला व पुरुष एकत्र), दुसरा टप्पा चार किमी (महिला व पुरुष गट) होता तर तिसरा टप्पा दोन किमी ९ वर्षांखालील मुलांसाठी ‘फन रन’ असा होता. बी.जी.बी.पी.एल.चे प्रमुख सी. नागेंद्र भट व सौ. वीणा भट, श्री. बाळासाहेब सोनवणे व सौ. सविता सोनावणे, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे रजिस्ट्रार कर्नल श्री. श्रीष कंबोज सर यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. प्रमुख पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखवताच आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व स्पर्धकांनी धाव घेतली.
स्पर्धेचा विविध गटातील निकाल –
८ किमी – पुरुष व महिला एकत्र गट –
१. प्रदीप भोई
२. चेतन राठोड
४ किमी – पुरुष गट – १. बालाजी अडवाल
२. स्वप्निल गलांडे
महिला गट – १. तनिष्का पाटील
२. रचना बांडे
स्पर्धेत सहभागी असणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल देऊन गौरवान्वित करण्यात आले.
भिगवण व दौंड पोलिस विभागाने मॅरेथॉन मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक व पार्किंगचे नेटके नियोजन केले तसेच शाळेतर्फे स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर वॉटर स्टेशन, एनर्जी ड्रिंक व वैद्यकीय सुविधांचे नियोजन केल्याने स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यास मदत झाली. भिगवणमधील नामांकित लोकांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारून स्पर्धेला हातभार लावला. या स्पर्धेत भिगवण, दौंड, इंदापूर, करमाळा, अहमदनगर, कर्जत व बारामती या विविध भागातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल ॲथलेटिक्स श्री. मनोज डोबांळे व श्री. तुषार निंबाळकर व भिगवण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. दिलीप पवार हे उपस्थित होते.
ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, बिल्ट, भिगवणच्या टीमने मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतले म्हणून ही स्पर्धा ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली व यशस्वी झाली. या यशस्वीतेसाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आदरणीय विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, उपाध्यक्ष ॲड. अशोकराव प्रभुणे, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री. किरणदादा गुजर, रजिस्ट्रार श्री. श्रीष कंबोज व डॉ. प्रेमेंद्र देवकाते यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या परिसरातील अशा प्रकारची ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे, त्यांचे सहकारी व कर्मचारी वृंद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.