बारामती, दि. १ : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सिल्वर ज्युबिली उप जिल्हा रुग्णालय बारामती मधील आयसीटीसी व एआरटी विभाग यांच्यामार्फत विशेष एड्स कार्यक्रमाचे १ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी एड्स दिनाच्या “समानता” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाच्या प्रारंभी एचआयव्ही संक्रमित व्यक्तींना समानतेची वागणून देण्याबाबत नागरिकांना शपथ देण्यात आली. तसेच गिरीराज नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरात प्रभातफेरी काढून एड्स रोगाविषयी जनजागृती केली.
यावेळी इन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियातर्फे गरजू रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधे व फार्मा असोसिएशन तर्फे रुग्णांसाठी आवश्यक ग्रीन बुक्स व टोकन भेट देण्यात आली. एआरटी सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती संत यांनी एचआयव्हीच्या सद्यस्थितीचा आढावा घेवून सेंटर मार्फत रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली.
आयसीटीसी व एआरटी सेंटर यांच्यावतीने येत्या आठवड्यात एड्सच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये व्याख्यान, रुग्णांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे शिबिर, लहान मुलांसाठी सामूहिक वाढदिवस साजरीकरण व पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी विशेष करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा यांचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस, इन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, आयसीटीसी व एआरटीचे नोडल अधिकारी डॉ. अमित कोकरे, एआरटीचे समुपदेशक अजित शेंडे, क्षयरोग विभागाचे श्री. मोहिते, उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सर्व कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते.