माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचारी महिलेचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. आज पहाटे पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिस अंमलदार शितल जगताप-गलांडे यांचे निधन झाले. दहा दिवसांपूर्वीच त्यांची प्रसुती झाली होती. त्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
शितल जगताप यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यातील संपूर्ण संगणकीय प्रणालीच्या कामकाजाची जबाबदारी होती. प्रसुतीपर्यंत त्या आपले कर्तव्य बजावत होत्या. सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या शितल जगताप यांच्या आकस्मिक निधनामुळे पोलिस दलासह बारामती शहर व पणदरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शितल यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी शितल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.