उन्हातान्हात, पोर रानात, गुरं राखते
चिंच गाभूळी, पिक्क्या बोराची, चव चाखते..
सुरपारंबी, विठी दांडूचा, खेळ रंगतो
डाव नेकीचा, बकाबकीचा, असा दंगतो
खेळ रंगात, मस्ती अंगात, लाज राखते
चिंच गाभूळी, पिक्क्या बोराची, चव चाखते..
भर उन्हात, पाय पाण्यात, डोह लाजतो
खोल मनात, तीच्या सख्याचा, पावा वाजतो
पावा वाजतो, जीव लाजतो, तोंड झाकते
चिंच गाभूळी, पिक्क्या बोराची, चव चाखते..
खेळ लगोरी, मन अघोरी, जाते धानात
शीळ घुमते, राघू मैनेची, फुल पानात
दूर रानात, गंध मनात, काया माखते
उन्हातान्हात, पोर रानात, गुरं राखते,
चिंचा गाभूळ्या, पिक्क्या बोराची, चव चाखते..
– हनुमंत चांदगुडे
सुपे, बारामती
9130552551