बारामती. (प्रतिनिधी : रियाज पठाण.) गुणवडी शाळेमधील ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ महिला शांताबाई रघुनाथ बोरावके (वय १०३ वर्षे ) यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील अनेक मान्यवरांनी ,तरुण मंडळींनी ध्वजाला सलामी दिली. गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ग्रामपंचायत गुणवडीच्या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व गुणवडी गावच्या सरपंच सरस्वती गावडे व उपसरपंच बाबाजी कांबळे, विद्यमान सदस्य सतपाल गावडे यांच्या हस्ते फेटे बांधून करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चित्रकला स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेतील कु.सीमादेवी शर्मा इयत्ता सातवी या विद्यार्थिनीचा सन्मानचिन्ह व मेडल व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे , मान्यवरांची भाषणे , देशभक्तीपर समूहगीते सादर झाली. स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसंग सर्वांना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव गुरुजी यांनी केले त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन गावातील एकही मुलगा शाळाबाह्य राहणार नाही यासाठी सर्वांचे योगदान मागितले. शैक्षणिक प्रगती झाली तरच सामाजिक प्रगती होणार आहे असेही त्यांनी नमूद केले. शाळेत राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ता पूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी विषद केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची उपशिक्षक महेंद्र भोसले यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. शेवटी आभार प्रदर्शन जगताप हर्षादेवी यांनी मानले.