बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे ) समाज परिवर्तनासाठी आता जुन्या पिढीवर अवलंबून न रहाता परिवर्तनाची जबाबदारी आता युवकांवर आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी केले आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी परिवर्तन परिषद या संघटनेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, इंडस्ट्रीअल मॅनिफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब जामदार, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मनसेचे राज्य उपाध्यक्ष ॲड सुधीर पाटसकर उपस्थित होते.
प्रा. चव्हाण पुढे म्हणाले की आपल्या मुला मुलींमध्ये प्रचंड गुणवत्ता असुन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास अगदी जागतीक स्तरावर ऑलिंपिक सारख्या स्पर्धेतही पदकांचा पाऊस पाडतील. त्याचबरोबर हजारो वर्षांचा अन्यायकारक इतिहास ज्या बाबासाहेबांनी लेखणीच्या जोरावर पुसुन टाकला त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालून वेळप्रसंगी संघर्षमय मार्ग स्वीकारत स्वाभिमानाने जीवन जगावे असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गणेश इंगळे यांनी आपल्या मनोगता मध्ये आदिवासी पारधी बांधवांनी उच्च शिक्षित होऊन चांगल्या पदावर विराजमान व्हावे. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य समन्वयक श्री.परमेश्वर काळे यांनी केले तर सूत्रसंचालन राज्य समन्वयक श्री.प्रमोद काळे व आभार राज्य समन्वयक श्री.आनंद काळे(सर)यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज्य समन्वयक अर्जुन काळे सौ.बबिता काळे, ऍड.उषा पवार, बापूराव काळे, सागर काळे, सूरज काळे, आकाश भोसले, लाला भोसले, सचिन काळे ,कुबेर भोसले, सूरज काका काळे, अभिजित काळे, प्रदीप भोसले आदी.मान्यवरांनी केले.