पुणेः- केवळ दीड दिवसाची शाळा शिकून अण्णा भाऊ साठे यांनी उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. आज केवळ भारतातच नव्हे, तर पाश्चात्य देशांमध्ये देखील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि व्यक्तिमत्वावर डॉक्टरेट केली जात आहे. असे असूनही अण्णा भाऊ साठे यांची भारतात उपेक्षा होते. ती थांबवून अण्णा भाऊ साठे यांना तातडीने भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांनी केली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानीत करावे, या मागणीसाठी अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव पासून पुण्यातील सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत क्रांती ज्योत काढण्यात आली होती. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंसध्येला या क्रांती ज्योतीचे पुण्यात आगमन होऊन त्याचा समारोप झाला. त्या ज्योतीचे आणि आंदोलनकर्त्यांंचे स्वागत करण्यासाठी आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यावर रशियन भाषेत साहित्य प्रकाशित करणा-या संशोधक आणि लेखिका अनघा भट, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहराध्यक्ष चंद्रशेखर पिंगळे, पुणे जिल्हा शहर मातंग समितीचे स्वागताध्यक्ष शंकर शेडगे, सचिव विकास सातारकर, महम्मद शेख, शिवाजी भिसे, जलसा वैराट, राजू वेळणूर, सुनीता जाधव, राजाभाऊ शिंदे, हरिभाऊ वाघमारे, रोहित वैराट, दत्ता कांबळे, सुरेखा भालेराव, गणेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगवान वैराट म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे प्रेरणा देणारे साहित्य असून त्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. आण्णा भाऊ साठे यांचे विचार हे मानवतावादी होते, त्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना साहित्याचा नायक केले.
यावेळी बोलताना रतनलाल सोनग्रा म्हणाले की, महानगरातील आधुनिक प्रश्न , झोपडपट्टीवासियांचे जीवन साहित्यात प्रखरपणे आण्णा भाऊ साठे यांनी त्याकाळी मांडले. साहित्याने माणूस समृद्ध होतो .आज माणूस जात आणि धर्मामध्ये विभागला जात आहे. अशा परिस्थितीत आण्णा भाऊ साठे यांचे विचार प्रेरणादायी आहेत.
यावेळी बोलताना अनघा भट म्हणाल्या की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आण्णा भाऊंची लेखणी आणि शाहिरी गर्जत होती. लोकजागृती हेच त्यांच्या साहित्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने आपल्या सर्व प्रकारच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि पीडितांच्या दुःखाला वाचा फोडली. मानवतावाद हाच त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असल्याने त्यांच्या साहित्यातील नायक-नायिका सर्वसामान्यांच्या काळजाला भिडतात. त्यांचे साहित्य हे कालातीत असून बंधुता-समता या तत्वांवर आधारलेल्या या साहित्याचा निदान आता तरी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गाैरव केला गेला पाहिजे.