बारामती दि. २५ : तालुक्यातील विविध गावात डिजिटल शेतीशाळेचे आयोजन करण्यात येत आहे, या शेतीशाळांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळी येथील प्रगतशील शेतकरी यांच्या शेतावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गणेश जाधव, कृषी पर्यवेक्षक मीरा राणे, कृषी सहाय्यक सचिन खोमणे, तंत्र सहाय्यक संजय घाडगे, अनुरेखक सिद्धार्थ कांबळे, अनिल काळोखे, पिंपळी गावचे तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
श्रीमती बांदल यांनी ऊस शेतीशाळा, आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान, जमिनीची तयारी, वाणांची निवड, बेणे प्रक्रिया, सुपर क्रेन, नर्सरी तयार करणे व नॅनो तंत्रज्ञान आधारीत द्रवरूप खतांचा वापर करून ऊसशेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. विकास अधिकारी अनिल काळोखे यांनीही मार्गदर्शन केले.
शेतीशाळा विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर आयोजित केल्या जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऑफलाईन कार्यक्रमात सहभागी होता येत नाही त्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीमती बांदल यांनी केले.