पुणे, दि. ६: पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार २०२२ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी राबविण्यात येत असून जिल्ह्यात योजनेच्या प्रचार प्रसिद्धी रथाचे नुकतेच उद्घाटन कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी उपसंचालक (फलोत्पादन) श्रीमती पल्लवी देवरे, कृषी उपसंचालक (सांख्यिकी) अरूण कांबळे, तंत्र अधिकारी श्रीमती अर्चना शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनीचे सहायक प्रबंधक नितिन कुमार स्वर्णकार, जिल्हा समन्वयक राहुल पालवे आदी उपस्थित होते.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार २०२२ योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. मृग बहार २०२२ मधील डाळींब या फळपिकासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याची तारीख १४ जुलै असून सिताफळ या पिकासाठी अंतिम तारीख ३१ जुलै अशी आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.