सांगवी येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतीशाळा संपन्न…

शेतमालावर प्रकिया केल्यामुळे बाजारभावात वाढ- तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल

बारामती दि. ५ : शेतीमालावर प्रक्रिया करण्याने मूल्यवर्धन होऊन शेतमालाच्या बाजार भावात वाढ होते आणि शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक फायदा मिळू शकतो, असे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल म्हणाल्या.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व सांगवी येथील नाथसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत शेतकरी शेतीशाळेचे आयोजन सांगवी येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्ह्याच्या स्मार्ट प्रकल्पातील समन्वयक ज्योती भालके, फलटण येथील मृदा शास्त्र कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अश्विनी ससाने, कृषी विस्तारक अनिल काळोखे, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ संतोष करंजे, नाथसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन नितीन तावरे, शेतकरी उपस्थित होते.

श्रीमती बांदल यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन प्रकल्प राबवू शकतात तसेच अधिकचे भांडवल उपलब्ध झाल्याने चांगली उलाढाल होऊ शकते. शेतकऱ्यांनी स्मार्ट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कृषी विस्तारक श्री. काळोखे यांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीकरिता जमिनीची निवड, पेरणी करताना खतांचा संतुलित वापर, बियाणे, पिकांची घटलेली उत्पादकता, हवामान बदल, भाजीपाला पीक कीड व रोग याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांनी केले. आभार कंपनीचे चेअरमन नितीन तावरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *