बारामती दि.१६-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात उभारण्यात आलेल्या व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे राजेश सातपुते व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या उद्योगामुळे १०० तरुणांना रोजगार मिळणार आहे. यात स्थानिकांनादेखील सामावून घेण्यात यावे, असे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.
विविध विकास कामांची पाहणी
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पंचायत समिती, नगर परिषद, तालीम संघाची इमारत, जुनी कचेरी, कऱ्हा नदीवरील पूल, शिवाजी उद्यान, पाण्याची टाकी परिसर आणि पाटस रोड येथील कालव्याशेजारील पुलाच्या जागेची पाहणी केली. कामे करताना नागरिकांच्या सुविधा आणि कामाचा दर्जा याबाबतीत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.