पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – तहसिलदार विजय पाटील

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – तहसिलदार विजय पाटील
बारामती दि.2 : कोरोना संकटामुळे दोन वर्षानंतर पालखी सोहळा होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येण्याचा अंदाज आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या बारामती तालुक्यातून मार्गस्थ होतात. हा  आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,  अशा सूचना तहसिलदार विजय पाटील यांनी दिल्या. 

            प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या  पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांढे आदी  उपस्थित होते. 

        श्री. पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, वीज,  रस्ते, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी बारामती तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.  भाविकांची कोणत्याही प्रकारची  अडचण होणार नाही यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पालखी स्वागताची तयारी चांगल्याप्रकारे करावी. पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात यावी. सोहळ्याच्या नियोजनाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तहसील कार्यालयात द्यावेत. सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे चांगल्यापद्धतीने नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. 

    यावेळी  मुख्याधिकारी रोखडे, गट विकास अधिकारी श्री. बागल, तालुका आरोग्य अधिकारी श्री. खोमणे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी त्यांच्या विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली. 
                         

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )