पुणे दि.११: शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर दाखले, अधिवास दाखले पावसाळा सुरु होण्यापुर्वीच सुलभपणे उपलब्ध करुन देण्यासाठी भोर व वेल्हा तालुक्यात १७ ते ३१ मे २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
भोर उपविभागातील भोर व वेल्हा हे दोन्ही तालुके अति पर्जन्य क्षेत्रात मोडणारे आहेत. दोन्ही तालुक्यांमधील बराच भाग हा दुर्गम असून दरवर्षी सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पावसाची सुरवात होते. त्यामुळे विशेष मोहिमेअंतर्गत प्राप्त परिपुर्ण दाखल्यांच्या प्रस्तावावर निर्णय घेऊन तात्काळ दाखले देण्यात येणार आहेत.
दाखले देण्याच्या मोहिमेसाठी सर्व तलाठी, मंडल अधिकारी, सेतू चालक व महा ई सेवा केंद्रचालक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोहिम कालावधीत जास्तीत जास्त दाखल्यांचे वितरण अत्यंत कमी कालावधीत करण्याचे उद्दीष्ट आहे. मोहिमेचा लाभ भोर व वेल्हा तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक व पालक यांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.