बारामती, दि. १९: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केले. त्यांच्या हस्ते परिसरातील ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, प्रवीण माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जीवन सरतापे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा, डॉ प्रतिभा गाडे, डॉ.चैताली वाघ, सरपंच अलका पोळ, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे यावेळी म्हणाले, गोखळी येथील आरोग्य उपकेंद्रात चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या उपकेंद्राच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत झाली पाहिजे. विकास कामे दर्जेदार झाली पाहिजेत. इंदापूर तालुक्यातील विकासकामांसाठी आवश्यक निधी दिला असून यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. तालुक्यातील विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.