बारामती: प्रशासकीय भवनाच्या बाहेर उपोषणकर्ती कांचन साक्षर भोसले यांच्या अमरण उपोषणास पुणे जिल्हा दक्षता समिती नियंत्रण समितीचे सदस्य साधु बल्लाळ यांनी भेट देवून या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बारामती तालुक्यातील सोनगाव येथील काही महिन्यांपूर्वी मे.अति.जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये व कांचन भोसले यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेत संबंधित गावातील इसमांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे व ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करूनही आजपर्यंत संबंधित इसमांना अटक केली नाही. यासाठी कांचन भोसले यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. त्याठिकाणी साधु बल्लाळ यांनी भेट दिली व याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरील इसमास अटक केली नाही व न्याय मिळत नाही अशा पद्धतीचे गार्हाणी मांडली असता, याबाबत माहिती घेवून योग्य तो न्याय मिळण्यासाठी समितीतर्फे प्रयत्न केला जाईल. सदर महिलेला समाज कल्याण विभागातर्फे जी काय मदत करता येईल ती करण्यात येईल व पोलीसांना विश्र्वासात घेवून समन्वय व संवाद साधून या गुन्ह्यात वस्तुस्थिती पाहता पुढील दिशा ठरविण्याकरीता प्रयत्न करू असेही बल्लाळ यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक गाव व तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अन्याय, अत्याचार, वाद-विवाद, जातीय दंगली व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये म्हणून सदरील समिती यावर नियंत्रण ठेवून काम करणार आहे. गाव,वाडी वस्त्यांवर जातीय सलोखा टिकावा यासाठी समितीतर्फे जनजागृती व योग्य मार्गदर्शन येणार्या काळात करण्यात येईल असा विश्र्वास साधु बल्लाळ यांनी यावेळी व्यक्त केला.