बचत गटांना शेळीपालनाचे शेड देण्यासाठी प्रस्ताव तयार करा : पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

पुणे दि.14: महिला बचत गटांना राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत शेळी पालनाचे शेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश राज्याचे क्रीडा आणि युवक  कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दिले.

पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, एनसीडीसीचे उपसंचालक संजय कुमार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.शशांक कांबळे आदी उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बचत गटाची सहकार विभागामार्फत नोंदणी करून त्यांना एनएलएम अंतर्गत अनुदान आणि एनसीडीसी मार्फत कर्ज उपलब्ध करून दिल्यास ते शेळीपालन करू शकतील. राज्यभरात ही योजना व्यापक प्रमाणात राबवावी. त्यासाठी शेळीच्या चांगल्या प्रजातींची माहिती घ्यावी असे त्यांनी सांगितले.

मंत्री महोदयांच्या हस्ते गोट बँक उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या नरेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीनंतर त्यांनी पशुधन संजीवनी सुविधेची माहिती घेतली. आयुक्त श्री.सिंह यांनी ही सुविधा उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *