बारामती दि. 2:- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांचे संयुक्त विद्यमाने तालुका कृषि अधिकारी कार्यालय बारामती येथे प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छित असलेल्या प्रक्रियादार, शेतकरी गट, वैयक्तीक लाभार्थी यांचेकरिता प्रशिक्षण कार्याक्रमांचे उदघाटन उपविभागीय कृषि अधिकारी, बारामती वैभव तांबे यांच्या हस्ते झाले.
सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या व भविष्यात त्यामध्ये वाढ करु इच्छिणाऱ्या प्रकिया उद्योगांसाठी केंद्र व राज्य शासनाने ही योजना पुरस्कृत केली आहे. यामध्ये ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातून टोमॅटो या पिकाची निवड करण्यात आली आहे. टोमॅटो पिकाच्या प्रक्रिया प्रकल्पासाठी नवीन नोंदणी करणाऱ्या प्रक्रियादारस या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जुन्या प्रकल्पामध्ये वाढ करु इच्छिणाऱ्या कृषि व संलग्न प्रक्रिया उद्योगांना देखील या योजनेमध्ये बँक कर्जाच्या निगडीत 35 टक्के किंवा 10 लाख या पैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमालावर प्रक्रिया करुन स्वत:चा ब्रॅड तयार करुन बाजारपेठेत स्वत:ची ओळख निर्माण करावी. तसेच शतकरी उत्पादक कंपनी, बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन बाजारपेठेत विक्री व्यवस्था उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्र बारामती आयोजित पोषण थाळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या मळदच्या एकता महिला शेतकरी गटाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यातआला.
श्री. तांबे यांनी तालुक्यातील प्रक्रियादारांना शेतकरी गट, वैयक्तीक लाभार्थीनी योजनेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.