महाराष्ट्र ही शूर वीरांची, महापुरुषांची, संतांची पावनभूमी आहे .या मातीत अनेक थोर महापुरुष जन्मले. त्यांनी लाखो कुळांचा उद्धार केला.अज्ञान ,अंधश्रद्धा ,रुढी परंपरा यात अडकून पडलेल्या जनतेला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखविला.महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज ,महर्षी शिंदे ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी आपल्या जीवाचे रान केले .या पंक्तीत बसणारे आणखी एक नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील.कर्मवीर आण्णांनी आपले उभे आयुष्य बहुजनांच्या घरोघरी शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी खर्ची घातले.आज आण्णांची जयंती त्यांना अभिवादन !
पायगोंडा पाटील आणि गंगाबाई यांच्या पोटी २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज या गावी भाऊरावांचा जन्म झाला.लहान भाऊरावांना वडिलांकडून औदार्य ,त्याग ,समता तर आईकडून अन्यायाचा प्रतिकार आणि दीनदुबळ्यांची सेवा या संस्काराचा ठेवा मिळाला.चार भितींच्या शाळेत रमण्यापेक्षा भाऊराव निसर्गाच्या शाळेत जास्त रमायचे.आपल्या सवंगड्यांच्या सहवासात रानावनात हिंडायला त्यांना खूप आवडायचे.शालेय जीवनात त्यांच्यावर महात्मा फुल्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव पडला.
आपल्या मुलाने मॕट्रीकपर्यंत शिकावे असे भाऊरावांच्या वडिलांना वाटे.परंतु भाऊरावांनी मध्येच शिक्षण सोडल्यामुळे त्यांना वाईट वाटले.भाऊराव मग मुंबईला गेले .पण मुंबईतील जीवनात ते रमले नाहीत .मुंबई सोडून ते साता-याला आले.
भाऊरावांनी शिक्षणाला रामराम ठोकला असला तरी शैक्षणिक कार्यांविषयी त्यांना खूप आवड होती .शिकवणी वर्ग सुरू करुन शैक्षणिक कार्याला सुरूवात केली.
गोरगरीब घरातील मुले शिकावीत यासाठी गावोगावी हिंडून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत.हे कार्य करत असताना भाऊरावांना अनेक संकटांचा सामना करावा लागला .तरीही न डगमगता ,न घाबरता हाती घेतलेले कार्य त्यांनी थांबविले नाही .
शिक्षणप्रसार हेच ध्येय मानून अत्यंत तळमळीने आपले कार्य करु लागले .यात तळमळीतून त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली .जी आज आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था म्हणून ओळखली जाते.
‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ‘ अशी शिकवण देणाऱ्या या संस्थेने महाराष्ट्रातील लाखो जणांना उभे केले .ही सगळी कर्मवीर आण्णांची पुण्याई म्हणावी लागेल.
अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी सुद्धा अण्णांना खंबीरपणे साथ दिली.आपल्या सौभाग्याचा अलंकार मंगळसूञ मोडून वसतिगृहातील मुलांच्या जेवणाची सोय केली.त्यांच्या दातृत्वाला आणि मुलांवरील मायेला कशाचीही उपमा देता येत नाही.पोटच्या मुलांप्रमाणे आण्णांनी मुलांना सांभाळले.त्यांना जीव लावला.
आण्णांनी केलेले हे कार्य हिमालयाच्या उंचीचे आहे .त्याची तुलना करता येत.शेवटपर्यंत त्यांनी आपला देह शिक्षणकार्यांसाठी झिजवला.महाराष्ट्राच्या इतिहासात कर्मवीर आण्णांचे कार्य सुवर्णअक्षरांनी नोंदले आहे.आण्णांचे हे कार्य हा महाराष्ट्राला कधीही विसरू शकत नाही एवढे महान आहे.
लक्ष्मण जगताप, बारामती.