मन, मेंदू, मनगट आणि मणका मजबूत असणाऱ्यांना अशक्य असं काहीच नसतं – डॉ. प्रकाश पांढरमिसे

प्रतिनिधी : दिपक वाबळे , देऊळगाव रसाळ
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील श्री दत्तकला शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन बारामती तालुक्यातील जराडवाडी येथे करण्यात आले होते. या शिबिराला दि.10 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे. यांनी सदिच्छा भेट दिली. व विध्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीत तरुणाईचे योगदान या विषयावर व्याख्यानपर मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी ते म्हणाले ,दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि सचिव प्रा. माया झोळ या दांपत्याने इंदापूर, दौंड, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना होतो आहे.

त्याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांना होतो आहे.या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे व महाविद्यालया सह संस्थेचे व आपल्या गावाचे नाव मोठे करावे. आजच्या या महाकाय स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.तरचआजच्या या वाढत्या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकू शकाल. राष्ट्राला नुसते विकसितच नव्हे तर जगाच्या नकाशावर दिमाखात दाखवायचे असेल तर आजच्या तरुणाईने आपले मन, मेंदू, मनगट आणि मणका मजबूत करायला हवा. आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्राला महासत्तेच्या दिशेने झेप घ्यायला वेळ लागणार नाही. अशक्य हा शब्द ज्यांच्या शब्दकोशात नसतो त्यांनाच तरुण म्हणतात. या तरुणाईने जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर खूप मोठे परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही.

आजच्या तरुणाईने ज्यांच्या हाती शून्य होते. अशा शून्यातून विश्व् निर्माण केलेल्या कर्तबगार व्यक्तींच्या यशोगाथा, जीवनगाथा वाचल्या पाहिजेत. इतिहासात होऊन गेलेल्या महापुरुषांचा भूतकाळ जरूर वाचावा. या भूतकाळाचा वर्तमान बनवावा.तोच येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भविष्यकाळ होईल. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करताना वाद्यांचा जागर करण्याऐवजी विचारांचा जागर करायला हवा. महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी त्यांनी सांगितलेले विचार डोक्यात घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. तरुणाईच्या सळसळत्या रक्ताला अशक्य असं काहीच नसतं. युवा या शब्दाला उलटा करा तो वायू होतो. जो वायूच्या वेगाने जाऊन प्रगतिकारक परिवर्तन घडवू शकतो. ती जिद्ध प्रत्येकाने अंगी बाळगली पाहिजे. आजच्या या तरुणाईने ‘नाचण्या’ ऐवजी ‘वाचण्याला’ जर महत्व दिलं तर ही तरुणाई क्रांतीमय परिवर्तन करू शकतते.आजच्या या महाकाय स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर तरुणाईने ज्ञानाच्या विविध क्षेत्रात यश आणि संशोधन संपादित केले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय शिबीर शिबिरात सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. श्रमसंस्कारा बरोबरच वर्तनात परिवर्तन घडवून आयुष्याला सकारात्मक दिशेने नेहू शकते. असे मत डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी व्यक्त केले व शिबिरार्थी विध्यार्थ्यांना शिबिरातील उरलेल्या दिवसांसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच प्राथमिक शाळा परिसरात विध्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी वैभव भापकर यांनी नेहरू युवा केंद्राच्या करत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विषयी विध्यार्थ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.कमलकिशोर शर्मा यांनी केले.त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील तीन दिवसात केलेल्या कामाचा अहवाल सादर करताना गावकऱ्यांनी केलेले सहकार्य ही आमच्या साठी खूप मोठी पावती आहे असे मत व्यक्त केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शिबिराविषयीं आपले अनुभव शेअर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार बारवकर याने केले तर प्रा.कमलकिशोर शर्मा यांनी प्रास्ताविक केले तर प्रा.सौरभ साबळे यांनी आभार मानले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विध्यार्थी – विध्यार्थिनीं व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *