आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, असे अनेकजण तक्रार करतात. दैनंदिन जीवनातील धावपळ करत असताना स्वत:ची काळजी घेतली पाहिजे हेही अनेकांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्यानंतर लक्षात येते. मग सुरु होतात डॉक्टरांकडच्या फे-या. ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा. अशी वेळ येण्याआधीच जर सर्वांनी प्राणायाम ,योगासने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून करायला सुरवात केली तर दवाखाने गाठण्याची वेळच येणार नाही. आता सध्याच्या परिस्थितीत हे खूप गरजेचे आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस '' आंतरराष्ट्रीय योग दिन'' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण सर्वांनी म्हणूया... नित्य करुया योग : पळवून लावू रोग....

योग उपचारामुळे मनुष्याची शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक प्रगती होते. त्याचबरोबर श्वसनसंस्था बळकट करण्यासाठी व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होते. योगासनांचा अभ्यास करण्यापूर्वी आपले शरीर व मन अभ्यासासाठी तयार करणे गरजेचे असते. शरीरामध्ये हलेकपणा व लवचिकता आणणे तसेच सर्व सांधे मोकळे करणे आवश्यक असते.

शारिरीक पूर्वतयारी


शरीरातील सर्व सांध्यांच्या म्हणजे पायाच्या बोटांपासून ते मानेपर्यंत सर्व हालचाली क्रमाने कराव्यात. मानसिक तयारी मध्ये प्रार्थना, ध्यान व ओंकार जप यांचा समावेश करावा. प्रत्येकाला यामध्ये आपल्या सोईनुसार बदल करता येईल. योगसाधनेसाठी मनाची तयारी, मन स्थिर करणे एवढीच अपेक्षा असते.


योगासने करताना पाळावयाचे नियम


योगाभ्यासासाठी वयाचे बंधन नाही. स्त्री-पुरुष, लहान मुले ते वृध्दांपर्यंत सर्व व्यक्ती आसनांचा अभ्यास करु शकतात. योगासने पहाटे लवकर उठून किंवा सायंकाळी रिकाम्या पोटी करावीत. जेवणानंतर वज्रासनाव्यतिरिक्त अन्य आसने करु नयेत. आसनांसाठीची जागा सपाट असावी. आसने प्रसन्न, मोकळ्या व नैसर्गिक वातावरणात करावीत. आसन पूर्ण होईपर्यंत परस्पर संभाषण किंवा हास्यविनोद करु नयेत. सोप्या आसनांपासून सुरवात करुन हळूहळू कठीण आसनांचा अभ्यास करावा. आसनांचे वेळी श्वासोच्छवास हा नैसर्गिक असावा. थकवा येईपर्यंत आसने करु नयेत. आसनांच्या शेवटी 10 ते 15 मिनीट शवासन करावे.


नियमित योगाभ्यासाचे फायदे


योगाभ्यास करणारी व्यक्ती उन्नत व संस्कारयुक्त जीवन जगते. योगाभ्यासामुळे आरोग्य उत्तम राहून दिर्घायु प्राप्त होते. ताण-तणावांपासून मुक्ती मिळून आत्मविश्वास वाढतो. योगामुळे मानसिक शांती प्राप्त होत असल्याने जीवन समाधानी होऊन व्यक्तीमत्त्व विकास होतो. मानसिक विकार व अनिद्रा यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यासाद्वारे आरोग्य उत्तम राहून बौध्दिक विकास होण्यास मदत होते. बदललेल्या जीवनशैलीशी निगडीत लठ्ठपणा, मधुमेह, रक्तातील चरबी वाढणे अशा आजारांवर योगाभ्यासाद्वारे नियंत्रण मिळवता येते. आसनांचा नियमित अभ्यास केल्याने रक्ताभिसरण योग्य होऊन ह्रदयाचे, फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. उत्साह वाढतो, मेंदूचे कार्य सुधारते.
ब-याचदा व्यवहारात योगासने हा व्यायाम प्रकार समजून योगासने केली जातात. व्यायामामध्ये शरीराच्या हालचाली गतिमान असतात परंतु आसनामध्ये शरीर स्थिर असणे अपेक्षित असते. व्यायाम समजून योगासने केल्यास त्याचा अपेक्षित लाभ न मिळता शरीराला हानी पोहोचू शकते. यासाठी आसन व व्यायाम यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. अखंड भारताला लाभलेली वैभवशाली व अनमोल अशी योग साधना शास्त्रोक्त पध्दतीने करून आपले जीवन आरोग्यसंपन्न व सुखमय, दीर्घायु करण्याचा संकल्प या योगदिनाच्या निमित्ताने करुया.

              विभागीय माहिती कार्यालय,पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *