पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराचे वितरण

पुणे दि.२०: ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकरी, शेजमजुराला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आवश्यक असून शेळी-मेंढीपालन हा त्यावर सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले.

पशुसंवर्धन विभागाच्यावतीने गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे आदी उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले, ग्रामीण भागात शेळय़ा-मेंढय़ा असलेल्यांकडे चांगला उत्पन्नाचा स्त्रोत आहे. शेळीचे वजन वाढवणे आणि अधिक दूध देणारी शेळीची प्रजाती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याकडे सध्या देशी शेळीचे वजन २० ते २५ किलो आहे. त्यांचे वजन किमान ६० किलोपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. शेळीची दूध देण्याची क्षमता वाढवण्याचाही प्रयत्न आहे. यामध्ये यश आले तर ग्रामीण अर्थव्यवस्था नक्कीच सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना कालावधीत आर्थिक अडचण असतानाही कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाने चांगले काम केले. विभागाचे स्थान कायम उंचीवर राहील, असाच आपला प्रयत्न आहे. पशुसंवर्धन विभागात संशोधन व विकासाला संधी आहे. शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील अधिकारी आहेत, त्यामुळे आपल्या गावातील पशुपालक शेतकऱ्यांना तसेच विभागाला नवीन दिशा कशी देता येईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुचिकित्या केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोरोना कालावधीतही पशु पालकांनी चांगली सेवा देण्यात आली. या कालावधीत कुक्कुटपालन व्यवसायाने उभारी घेतली आहे. कोरोना कालावधीत प्रयोगशाळेची गरज लक्षात घेत शासनाने तत्परतेने त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून काम प्रगतीपथावर आहे. पशुसंवर्धन विभागाने ‘सुंदर माझे कार्यालय’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कार्यालयाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

यावेळी पशुसंवर्धन विभागातील ८२ अधिकाऱ्यांचा गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

लोकर वस्तु विक्री केंद्राचे उद्घाटन

तत्पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत सुरू करण्यात आलेल्या लोकर वस्तु विक्री केंद्राचे उदघाटन मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून लोकर उत्पादने तसेच शेळीचे दुध व पुरक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक शशांक कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *