बारामती,दि.११ : बारामती तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मासिक बैठकीचे  तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थित प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजन करण्यात आले.

 बैठकीस महसूल नायब तहसिलदार महादेव भोसले, शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड आणि  दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

 बारामती तालुक्यात २२० स्वस्त धान्य दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी १८० स्वस्त धान्य दुकाने, तहसिल कार्यालय आणि शासकीय धान्य गोदाम यांना आय. एस. ओ. ९००१-२०१५ आणि आय. एस. ओ. २८०००-२००७ मानांकन प्राप्त झाले आहे. यावेळी आय. एस. ओ. मानांकन प्राप्त स्वस्त धान्य दुकानदारांना  तहसिलदार पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 
 यावेळी श्री. पाटील म्हणाले, ज्या स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थी मयत झाले आहेत त्यांची यादी तयार करून आर सी क्रमांकासह कार्यालयात जमा करावी. मयत लाभार्थ्यांचे धान्य ऑनलाईन काढण्यात येवू नये. सर्व शिधापत्रिका धारकांना पावत्या देण्यात याव्यात. स्वस्त धान्य दुकानात चांगल्या प्रकारचे फलक असावेत. तालुक्यातील दक्षता समितीच्या सदस्यांचेही फलक दुकानात लावावे असे निर्देशही त्यांनी दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *