पुणे, दि. ३१: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत ‘आंबा महोत्सवाचे’ आयोजन १ एप्रिलपासून गुलटेकडी मार्केटयार्ड येथे करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे पणन संचालक तथा पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी दिली आहे.

विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने आंबा महोत्सवाचे सन २००२ पासून आयोजन करण्यात येते. कोरोना परिस्थितीमुळे मागील वर्षी महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. तथापि, यावर्षी पुणे तसेच राज्यभर महोत्सवांचे आयोजन करण्याच्या सूचना सहकार व पणन मंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या होत्या.

१ एप्रिलपासून पणन राज्यमंत्री तथा पणन मंडळाचे उपाध्यक्ष शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव आयोजनास पुण्यापासुन सुरूवात करण्यात येत आहे. सुरूवातीस रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादक यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच हंगामानुसार पुढे राज्यातील केशर आंबा उत्पादकही सहभागी होणार आहेत.

हा महोत्सव ग्राहकांच्या सोईसाठी गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे च्या प्रवेशद्वार क्रमांक ९ येथील पीएमपीएमएल बस डेपो समोरील वखार महामंडळाच्या मोकळ्या जागेत सुरू करण्यात येत आहे. महोत्सव ३१ मे २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.

पणन मंडळाकडे बहुतांश हापूस व केशर आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून सुमारे ५१ स्टॉल आंबा उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी या महोत्सवास भेट देऊन थेट आंबा उत्पादकांकडून आंबा खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *