पुणे दि.23: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत प्रात्यक्षिकांच्या गावांमध्ये तसेच नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्याच्या कार्यक्षेत्रात सिंगल सुपर फॉस्फेट वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेले आहेत.

मृद परीक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीचा  वापर करण्यात येणार आहे. फॉस्फेटिक खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये फॉस्फरस, सल्फर, कॅलशिअम तसेच काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकामध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. परंतु एसएसपी या खताच्या सुयोग्य प्रमाणात वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरुकता नसल्याची बाब पुढे आली आहे.

तीन बॅग एसएसपी आणि एक बॅग डिएपीसाठी शेतकऱ्यांना सारखीच रक्कम खर्च करावी लागते. सारख्याच प्रमाणात स्फुरदाची मात्रा पिकाला मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांना करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र शासनाने एसएसपी खताच्या वापराबाबत जागरुकता मोहीम व प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबविण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत.

राज्यातील सर्व कृषी यंत्रणांच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानमधील प्रात्यक्षिकांच्या गावांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्याच्या कार्यक्षेत्रांमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक हंगामाकरीता आवश्यक खते शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतील व खतांच्या उपलब्धतेवावत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. या उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा व सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा आवश्यकतेनुसार वापर करण्यात येऊन भरघोस उत्पन्न वाढीस चालना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *